नागपूर -शिर्डी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ: राष्ट्रहित समोर ठेऊन काम करणे गरजेचे , पंतप्रधानांच्या हस्ते अनेक विकास कामांचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.११) सकाळी नागपुरात साडेतीन तासांच्या दौऱ्यात वायफळ टोलनाका येथे नागपूर -शिर्डी समृद्धी महामार्ग, (Samruddhi Mahamarg) एम्स, मेट्रो फेस 1 लोकार्पण, फेज 2 शुभारंभ, नागपूर – बिलासपूर वंदेभारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी, अजनी, नागपूर रेल्वेस्थानक विकास, अजनी मेंटेनन्स डेपो, चंद्रपूरचा 51 कोटींचा सिपेट प्रकल्प अशा विविध योजनांचा शुभारंभ केला. यावेळी ते बोलत होते.

केवळ सत्तेसाठी आमदनी अठ्ठणी आणि खर्चा रुपया, या पद्धतीने करदात्यांच्या पैशाचा गैरवापर होऊ नये. कुठलेही व्हिजन नाही, देशाच्या विकासात कुठलाही शॉर्टकट चालत नाही, राष्ट्रहित समोर ठेऊन काम करणे गरजेचे आहे. दिशाहीन, स्वार्थी राजनीती महत्त्वाची की स्थायी विकास ? असा सवाल करून स्थायी समाधान निवडायचे, हे देशातील जनतेने आता ठरविले आहे. (Samruddhi Mahamarg) नुकत्याच झालेल्या गुजरातच्या निवडणुकीत जनतेने याविषयीचा निर्णय दिलेला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंग कोशारी ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, भारती पवार, खासदार कृपाल तुमाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आम्ही पुढचे 25 वर्षाचे व्हिजन घेऊन काम करीत आहे. महाराष्ट्रातील जनतेने देशातील या विकृतीपासून, शॉर्टकट राजकारणापासून, देशाचा पैसा लुटणाऱ्यांपासून, त्यांची कमाई लुटणाऱ्या या राज्यकर्त्यांकडून, राजकीय पक्षांकडून सावध राहिले पाहिजे, आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. कारण हे लोक सत्ता हडपण्यासाठी कार्यरत आहेत. ते कधीही देश घडवू शकत नाहीत, असा घणाघात त्यांनी कुणाचेही नाव न घेता विरोधकांवर केला.

करदात्याने दिलेल्या पैसा आजवर केवळ भ्रष्टाचारात किंवा सत्तेसाठीच वापरला गेला. आज देशाची ही गंगाजळी युवा पिढीच्या भविष्यासाठी आम्ही खर्च करीत आहोत. जे वंचित उपेक्षित राहिले, आजवर ते आता आमच्या प्राधान्य क्रमवारीत पुढे आहेत. छोट्या शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतोय. पशुपालकांसाठी काम करतो आहे. वेंडर्सना सुविधा देऊन त्यांना कर्ज देत आहे.