महाविकास आघाडीची एकत्रित ताकद विधान परिषद निवडणुकीत भाजपपेक्षा वरचढ

भाजपला नागपूर शिक्षक तसेच अमरावती पदवीधर मतदारसंघ या आपल्या प्रभावक्षेत्रात पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत संघटन कौशल्य, नोंदणीत केलेली चिकाटी हे मुद्दे प्रभावी ठरतात. त्या पार्श्वभूमीवर भाजपला केवळ कोकण शिक्षक मतदारसंघात यश मिळाले. त्यातही हा उमेदवार बाहेरून आलेला होता. येथून विजयी झालेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी गेल्या वेळी पराभूत झाल्यानंतर नेटाने सहा वर्षे बांधणी केली. त्यामुळे यंदा त्यांनी सहज विजय मिळवला. येथेच मतदार नोंदणी किती महत्त्वाची आहे हे ध्यानात येते. एकूणच पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातील पराभव म्हणजे सुशिक्षित मतदार नाराज आहेत काय, याचा विचार भाजपने केला पाहिजे.

विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भातीलच त्यातही नागपूरचे. मात्र नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपचे आमदार नागो गणार यांचा पराभव झाला. सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. संघ परिवारातील शिक्षक परिषदेचे उमेदवार म्हणून ते रिंगणात होते. त्यांना भाजपचा पाठिंबा होता.

अमरावतीतही भाजपचे माजी मंत्री रणजित पाटील यांचा पराभव धक्कादायक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासाठी सभा घेतली होती. मात्र पदवीधरांच्या विविध संघटनांनी काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना दिलेला पाठिंबा निर्णायक ठरला. खरे तर लिंगाडे हे शिवसेनेचे. मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे गेली. काँग्रेसमध्ये प्रवेश करून ते विधान परिषदेत पोहचले. लिंगाडे यांनी निवडणूक लढवायची या जिद्दीने केलेली नोंदणी पथ्यावर पडली. भाजपला हातचा मतदारसंघ गमवावा लागला. नागपूरमध्ये पदवीधर पाठोपाठ शिक्षक मतदारसंघ भाजपला गमवावा लागला.

कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपला आयात उमेदवाराच्या विजयावर भाजपला आनंद मानावा लागत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा येथे पराभव झाला. भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पूर्वी शिवसेनेत नंतर शिंदे गटात असताना शिक्षकांशी संपर्क ठेवला. या मतदारसंघात शिक्षक परिषदेचे प्राबल्य होते. गेल्या वेळी बाळाराम पाटील यांनी ते मोडीत काढले होते. शेकापचा प्रभाव मर्यादित आहे. त्या तुलनेत कोकणातील पाच जिल्ह्यांत यंत्रणा उभारणे म्हात्रे यांना शक्य झाले.

नाशिक पदवीधर तसेच मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निकाल अपेक्षितच आहेत. नाशिकमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवरून बराच घोळ झाला. सत्यजित तांबे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. त्यांची व्यक्तिगत यंत्रणा मोठी आहे. त्याच्या जोरावर महाविकास आघाडीच्या पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा त्यांनी पराभव केला. येथेही नाशिक, अहमदनगर असे मोठे जिल्हे या मतदारसंघात समाविष्ट असतानाही भाजपला उमेदवार देता आला नाही. खरे तर एखाद्या कार्यकर्त्याला निर्देश देऊन सहा वर्षे नोंदणी करून रिंगणात उतरवणे पक्षाला शक्य होते. मात्र त्यांना तगडा उमेदवार सापडला नाही.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काळे यांनी केलेल्या बांधणीच्या जोरावर चौथ्यांदा यश मिळवले. भाजपला येथेही तुल्यबळ उमेदवार देता आला नाही.

महाविकास आघाडी म्हणून एकत्रित ताकदही मोठी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आल्यावर भाजपला यश मिळवणे आव्हानात्मक आहे हे निकालातून अधोरेखित झाले आहे.