
मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीनं शरद पवारांसह ७० नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. बँकेशी काहीही संबंध नसताना गुन्हा दाखल झाल्यानं पवार यांनी स्वत: ईडीच्या कार्यालयात जाऊन आपली भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनंही संघर्षाचा पवित्रा घेतला होता. राज्यभरात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळं राजकीय घडामोडींना वेग आला होता. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती.
याचा अंदाज आल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे व सह पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विनय चौबे यांनी स्वत: पवारांची भेट घेऊन ईडीच्या कार्यालयात न जाण्याची विनंती केली. त्यांची विनंती मान्य करून पवारांनी तूर्त आपला निर्णय मागे घेतला. पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर पवार यांनी स्वत: मीडियाला सामोरं जात निर्णय जाहीर केला.






