एक मनोगत : डॉक्टर भास्कर धाटावकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व!

एक मनोगत

डॉक्टर भास्कर धाटावकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व! आज त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन व 70 वा वाढदिवस हा सुंदर योग जुळून आला आहे. या आनंददायक सोहळ्याला मला उपस्थित राहता येत नाहीय याचं दुःख वाटतंय पण त्यानिमित्त मला माझ्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात.

भास्करची आणि माझी ओळख अगदी कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून ची! गेली पन्नास वर्ष अभिमान वाटावा अशी ही मैत्री आहे. कॉलेजमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यामध्ये त्यांची ओळख एक गुणी विद्यार्थी अशीच होती. कॉलेजच्या सर्व कार्यक्रमात भाग घेणारा, कुणालाही काही अडचण आली तर मदतीला धावून जाणारा, सदैव हसऱ्या चेहऱ्याचा असा तो धडपड्या या मुलगा होता. त्याचवेळी त्याच्या वैयक्तिक जीवनांत तो संघर्ष करत होता पण त्याच्या चेहऱ्यावरचे हसू कधी मावळले नाही किंवा परिस्थितीचे रडगाणे त्यांनी कोणापुढे गायले नाही. हसतमुखाने परिस्थितीवर मात करणे हे त्याचे वैशिष्ट्य त्यांनी आयुष्यभर जपले. इतिहास हा आमच्या दोघांच्या आवडीचा कॉमन विषय. पुढे तो अलिबाग सोडून शिक्षणासाठी पुण्याला गेला तरी मैत्री कायम राहिली इतिहासावरची, वैयक्तिक सुखदुःखांची चर्चा रंगतच राहिली. आजही इतिहासाबाबत काही शंका वाटली तर भास्करलाच फोन लावला जातो आणि तोही तत्परतेने त्या शंकेचे निरसन करतो,इतकचं काय माझ्या मुलांनाही इतिहास विषयक काही विवाद्य मुद्दावर माहिती हवी असली तरी भास्कर कडेच धाव घेतली जाते.आमच्या दृष्टीने भास्कर म्हणजे इतिहासातला शेवटचा शब्द!तेवढा त्याचा अभ्यास दांडगा आहे. मित्र-मैत्रिणींच्या मैफलित तो आपल्या इतिहासाच्या ज्ञानाने नेहमीच बाजी मारतो!

महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख विभागात संचालक पदावर काम करत असताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण कामं केली आहेत. वानगी दाखल काही उदाहरणं द्यायचंमी झाली तर, गावोगावी सुरू केलेले मोडी लिपीचे वर्ग, दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रावर संशोधन यांचे देता येईल. इतिहासावर त्यांनी अनेक अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलेली आहेत. त्याचा संदर्भ ग्रंथ म्हणूनही वापर करता येईल इतक्या योग्यतेचे ते लेखन आहे.

महत्त्वाचे म्हणजे प्रौढ वयात अतिशय चिकाटीने त्याने पीएचडीची पदवी मिळवली आहे. इतिहासा व्यतिरिक्त त्यानी काव्य, कथा, व्यक्तिचित्रण प्रवास वर्णन अशा विविध विषयात लेखन केलेले आहे.

सतत काहीतरी शिकत राहणे, आपल्याला जे ज्ञान आहे ते इतरांना भरभरून देणे, सतत आनंदी आणि उत्साही राहणे हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू आहेत. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनःपूर्वक म्हणते ,’जीविते शरदः शतम्’! तू, शंभर शरद ऋतू पहा. शरदच का तर शरद ऋतू हा उत्साह आनंद व चैतन्य याचे प्रतीक आहे. तुझे आयुष्यही असेच आनंदाने आणि चैतन्याने समृद्ध राहू दे; अशी मी परमेश्वरा चरणी प्रार्थना करते!

सदैव स्नेहांकित,

सौ.हेमा.(सौ.अनुराधा म्हात्रे. )

अल्प परिचय

नाव डाॅ.भास्कर धाटावकर

जन्म तारीख 28 जून 1953

शिक्षण एम.ए, पी एच डी.

उल्लेखनीय गोष्टी

1 1978–80 जे एस एम काॅलेज अलिबाग येथे इतिहासाचे प्राध्यापक

2 1981 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्यक संचालक पदावर निवड आणि 30 जून 2011 संचालक पदावरून सेवानिवृत्त

3 मंत्रालयात अभिलेख व्यवस्थापन शास्त्राचे व्याख्याते म्हणून काम केले

4 सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे इतिहास अभ्यास मंडळावर शिक्षकेतर तज्ञ म्हणून काम केले.

5 भारतीय इतिहास काँग्रेस आणि भारतीय ऐतिहासिक आयोगाचे सन्माननीय सदस्य

6 अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे संस्थापक 1986—1996 कार्यवाह म्हणून काम केले.

7 पुराभिलेख संचालनालयामार्फत मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करून तसेच अभिलेख व्यवस्थापन शास्त्राचे कार्यशाळा आयोजित करून महाराष्ट्रातील सर्व जिल्हय़ातून व्याख्याने दिली.

8 सध्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पी एच डी चे मार्गदर्शक म्हणून काम करीत असून आतापर्यंत चार विद्यार्थ्यांना डाॅक्टरेट पदवी मिळाली आहे.

साहित्य विर्मीती—

1 डाॅ.धाटावकरांनी काव्य संग्रह, व्यक्तिचित्रण, कादंबर्‍या असे 21 पुस्तकांचे लिखाण केले असून त्यामध्ये छत्रपती शिवाजीमहाराज, छत्रपती संभाजी महाराज, ऐतिहासिक लेख संग्रह, इतिहासावरील निवडक व्याख्याने इत्यादीचा समावेश आहे.

3 डाॅ.भास्कर धाटावकर यांनी पुराभिलेख विभाग लोकाभिमुख होण्यासाठी ऐतिहासिक दुर्मीळ दस्ताऐवज, छायाचित्रे,ग्रंथाचे महाराष्ट्रातील सर्व जिल्हय़ातून प्रदर्शन आयोजित करून आमजनतेला पुराभिलेख विभागाच्या कार्याची माहिती करून दिली याशिवाय एक 14 मिनिटाची डाॅक्युमेंटरीची निर्मिती केली.2005 मध्ये पब्लिक रेकॉर्ड अॅक्ट पारीत करून घेतला.

4 डाॅ.धाटावकर सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेत असतात.