
ठाणे: काल रात्री पासून मुसळधार पावसामुळे ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असून मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. तसेच मुंबई, नवी मुंबई सह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, रात्रीपासून पालघरममध्ये मुसळधार अनेक भागात पाणी शिरले असून जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पालघरमधून वाहणाऱ्या सूर्या आणि वैतरणा या नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तसेच अनेक सखल भागांमध्ये पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पालघरमधील धरणेही तुडुंब भरली आहेत. शिवाय पालघरला जोडणारे सर्व रस्ते बंद झाल्याने पालघर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे.
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. कल्याण, ठाणे रेल्वे स्थानकातही रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने कल्याण ते सीएसएमटी वाहतूक तब्बल अर्धातास उशीराने सुरु आहे. मुंबईच्या उपनगरांतही जोरदार पावसामुळे पश्चिम रेल्वेची सेवा पंधरा ते वीस मिनिटं उशिराने सुरु आहे. गोरेगाव, कांदिवली स्थानक परिसर जलमय झाला आहे. वसई-विरार पट्ट्यात तुफान पाऊस सुरू असल्याने पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा वेग मंदावला आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकात पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे.
हार्बर रेल्वेलाही पावसाचा फटका बसला असून या मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटं उशीराने सुरु आहे. वडाळा, गुरू तेज बहादूर नगर, मानखुर्द येथे रेल्वे रुळांवर पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे.






