
कोल्हापूर: महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यात पाऊस धुमाकूळ घालत असून , चार राज्यात पुरामुळे आतापर्यंत 93 लोक मृत्युमुखी पडले आहेत. केरळ राज्यात भूस्खलनमध्ये बरेच लोक अडकून पडले आहेत त्यामुळे मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
चारही राज्यात पुराने थैमान घातले असून हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे पीके उद्धवस्त झाली आहेत. घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वीज नसल्याने, खाण्याचे साहित्य नसल्याने लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकारी पातळीवर तसेच लष्कर आणि एनडीआरएफच्या मदतीने पूरग्रस्तांना मदत पोहोचवली जात आहे.

तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे जवान मदतीसाठी त्याठिकाणी पोहोचले आहेत. पूरग्रस्त चार राज्यातील १६ जिल्ह्यात १२३ पथकं लोकांच्या मदतीसाठी पाण्यात उतरले आहेत. केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. शुक्रवारी या ठिकाणी २७ तर शनिवारी ७ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये मागील ७२ तासांत एकूण ४२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटकच्या बगलकोट, रायचूर, बेलगाव आणि कलबुर्गी जिल्ह्यात ३३ बचाव पथकं लोकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. तर केरळमध्ये २४ बचाव पथकांसह ८ इंजिनिअर टास्क फोर्स अलेप्पी, एर्नाकुलम, पथानमथिट्टा, इदुक्की, मलप्पुरम, वायनाड, कन्नूर आणि कोझिकोड या ठिकाणी नागरिकांच्या बचावासाठी काम करीत आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागात मृत्युमुखींची संख्या २९ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान अनेक सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी आवाहन केले आहे. तरी नागरिकांनी सढळ हस्ते मदत करून पूरग्रस्तांना परत स्थापित करण्यासाठी हातभार लावावा.






