
नवी दिल्ली: रिलायन्स जिओने गिगाफायबर प्लॅन सुरू करण्याचे जाहीर केले आहे आणि लाँचिंग ऑफर मध्ये बंपर सेवा जाहीर केल्या आहेत. येत्या पाच सप्टेंबर पासून जिओ फायबर लाँच होणार आहे.
जिओ फायबरबद्दल अंबानी म्हणाले, ‘१६०० शहरांमधून १५ दशलक्ष लोकांनी गिगाफायबरची नोंदणी केली होती. जिओ फायबर प्रायोगिक तत्वावर सुरू केलं होतं. जिओ फायबरमुळे तुम्हाला प्रकाशाच्या वेगाचा ब्रॉडबँड स्पीड मिळेल. याव्यतिरीक्त अन्य अनेक स्मार्ट होम सुविधा आहेत.’
जिओ ब्रॉडब्रँड सेवेचा स्पीड १०० एमबीपीएसपासून सुरू होणार असून तो १ जीबीपीएसपर्यंत असणार आहे. जीओ गिगाफायबरवर इंटरनेट ऑफ थिंग्जम्हणजेच केबल टीव्ही, व्हॉइस कॉलिंग आणि नवे सिनेमे असणार आहेत. ज्या दिवशी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार त्याच दिवशी तो प्रिमिअम जिओ फायबर ग्राहकांना पाहता येणार आहेत. मिक्स्ड रिअॅलिटी (AR+VR)जिओ गिगाफायबरवर उपलब्ध होणार आहेत. वार्षिक वेलकम ऑफरसोबत मिळणार 4D/4K टीव्ही आणि 4K सेट टॉप बॉक्स मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजची आज मुंबईत ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. त्यात ही घोषणा करण्यात आली. यात इंटरनेट प्लान्स अगदी ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतच्या दरात मिळणार आहेत.






