
नवी दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जेटली हे गेल्या दोन वर्षांपासून आजारी होते. त्यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ होती. त्यावर उपचार करण्यासाठी ते न्यूयॉर्कलाही गेले होते. त्याआधी त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचारासाठी न्यूयॉर्कला जावं लागल्याने मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प त्यांना मांडता आला नव्हता. त्यांच्याऐवजी पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्प मांडला होता. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अर्थमंत्रीपदाबरोबरच संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता.
भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर जेटली यांनी तब्येतीच्या कारणास्तव मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता.






