
काँग्रेस-राष्ट्रवादीवाले छत्रपतींना विसरले: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक : एक महिना ४,२५० कि.मी. चा प्रवास करत मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेचा आज समारोप केला. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशकात दाखल झाले होते.
शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. विरोधक म्हणून त्यांनी आमच्यावर टीका करावी पण राष्ट्रहिताविरोधात वक्तव्य करणं दुर्दैवी आहे. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची मर्जी. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे?,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नाशिकमध्ये आज भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप झाला. या समारोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती लाभली होती. त्यावेळी ते बोलत होते.’गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात चांगली गुंतवणूक, शेतकरी, महिलांचा विकास झाला. भटक्या विमुक्त जाती, मागासवर्गीय जनतेला आवाज मिळाला. पूर्ण बहुमत नसतानाही महाराष्ट्रात प्रगतीशील सरकार भाजपच्या रुपात मिळालं. गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदा देशात स्थिर सरकार आलं.
हे केवळ फडणवीस सरकारचं रिपोर्ट कार्ड नाही; जनतेने स्थिर सरकारचे फायदे लक्षात घ्यायला हवेत. राजकीय अस्थिरतेमुळे गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसली होती, पण गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असं प्रतिपादन मोदींनी केलं. राममंदिर प्रकरणी सुप्रीम कोर्टवर विश्वास ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले, ‘राम मंदिरावरून वाट्टेल तशी बडबड करू नका. सध्या अनेक लोक वायफळ बडबड करत आहेत.’ यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातोश्रीवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.
भाजपत नुकतेच दाखल झालेले माजी खासदार उदयनराजे भोसले या सभेला व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जयकुमार रावल,आशिष शेलार,पंकजा मुंढे,राधाकृष्ण विखे पाटील,विनोद तावडे, गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे दैवत. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले या दैवताला विसरले म्हणून घरी बसले,’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्रातील जनतेने महाजनादेश यात्रेदरम्यानही मदत केली, असं फडणवीस यांनी सांगितलं.






