
महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान आणि निकाल 24 ऑक्टोबर
नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दोन्ही राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. ९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे.
संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही निवडणुकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच, दिवाळीपूर्वीच जाहीर केला जाणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान होत आहे. हरयाणा विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबरला संपत आहे. हरयाणात १ कोटी ८२ लाख ९८ हजार ७१४ मतदार आहेत.
२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना जारी होणार
४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत
५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर : मतदान
२४ ऑक्टोबर : मतमोजणी






