अन्यायकारक नो एन्ट्री,पार्किंग आणि टोल विरोधात वाहतूकदार करणार असहकार, ०३ ऑक्टोबर पासून जाणार बेमुदत संपावर

नवी मुंबई (सूर्यकांत गोडसे) : जे.एन.पी.टी. प्रशासन , नवीन रस्ते तसेच जुने रस्ते दुरुस्ती करणारी सर्व प्रधिकरणे यांच्या नाकर्तेपणा व वेळकाढू वृत्तीमुळे स्थानिक नागरिक,प्रवासी, वाहतुकदार हे तिन्ही घटक सततच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले आहेत. ठाणे व नवी मुंबई मध्ये या वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य जनतेला करावा लागत आहे.हि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस उपायुकत यांच्या अक्त्यारित येणाऱ्या अधिकाराच्या अधिसूचनेच्या अधिपत्याखाली वाहतूक कोंडी निर्गमित करण्यासाठी पूर्ण पोलिस यंत्रणा प्रयत्नशिल असते. परंतु त्याचा उलटा परिणाम कि काय? पोलिस यंत्रणेने विविध ठिकाणी ट्रान्सपोर्ट झोन मध्ये येणाऱ्या मुख्य मार्गावर प्रवेश बंदी व दंडात्मक कारवाई करते. परंतु कोणतीही चूक नसताना वाहतूकदारांना त्याचा नाहक फटका बसत आहे. परिणामी न्हावाशेवा परिसरामधुन देशाच्या विविध भागात कन्टेनरची वाहतूक करणारे सर्व वाहतुकदार संघटनांनी याबाबतची बैठक घेऊन जोपर्यंत हव्या असलेल्या सुविधा उपलब्ध होणार नाहीत तोपर्यंत वाहने रस्त्यावर न काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
वाहतूकदारांच्या काही प्रमुख मागण्या :
१) जे.एन.पी.टी.पासून १०० किलोमीटर अंतरापर्यंत सर्व रस्ते सुव्यवस्थित दर्जेदार असावेत. त्यावर लावालेली प्रवेश बंदी काढून रस्ते पूर्ववत करण्यात यावे. (शिळफाटा- म्हापे,जे.एन.पी.टी.परिसर)
२) जे.एन.पी.टी. परिसरातील SH 54, NH4B, गव्हान- दीघोडे या तिन्ही रस्त्यांना आपआपसात जोडणारे जोड़ रस्ते चांगले असावेत.
३) न्हावाशेवा पोर्ट परिसरातील सीएफएस व एमटी कन्टेनर यार्ड यांच्या कड़े स्वतःची पार्किंग नसल्याने होणारी कारवाई वाहतूकदारांवर न करता संबंधितांवर करावी. संबंधित यार्डला पर्किंग उप्लब्ध करून देण्याची ताकीद द्यावी.
४) जे.एन.पी.टी.प्रशासनाने त्यांच्या परिसरामध्ये वाहनांस विना शुल्क पार्किंगसाठी प्लॉट उपलब्ध करून वाहतूक तळ निर्माण करावेत.
५) वाहतूक कोंडी कमी करण्याकरीता लवकरात लवकर सर्विस रोडची कामे पूर्ण करून तो मार्ग स्थानिक व प्रवासी वाहने यांना उपलब्ध करून द्यावा.
६) जुना पुणे मार्गावरील टोल वाढ अन्यायकारक आहे.ती पूर्ववत करून अभ्यासपूर्वक टोल आकारण्यात यावा.
७) ई चलान मध्ये पारदर्शकता आणून त्यानंतरच कारवाई करण्यात यावी.
या मागण्यासाठी सर्व वाहतूकदार एकवटले असून त्यांनी पोलीस उपायुक्त यांना निवेदनाचे पत्र दिलेले आहे. तरी मागण्यांबाबत काही कारवाई झाली नाही तर ०३ ऑक्टोबर २०१९ पासून स्व इच्छेने कुणीही आपली वाहने रस्त्यावर काढणार नाही. जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे संघटनांच्या प्रतिनिधीने कळविले आहे