आघाडीत कॉंग्रेस कडून 51 उमेदवाराची यादी जाहीर तर युतीत शिवसेने मार्फत अनेक उमेदवारांना ए बी फॉर्म वाटप

मुंबई : विधानसभा निवडणूक रणधुमाळीत आज आघाडीत काँग्रेसने तर युतीत शिवसेनेने आपआपले अनेक उमेदवार जाहीर करून बाजी मारली आहे. अठरा तारखेला बीड मध्ये एन सी पी मार्फत पाच उमेदवार जाहीर केल्यानंतर आज काँग्रेसने आपल्या ५१ उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेने तर युतीची अधिकृत घोषणा होण्याआधी ए बी फॉर्म वाटप केले आहे.

काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ५१ उमेदवार घोषित करण्यात आले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतील भांडूप पश्चिम मतदारसंघातून सुरेश कोपरकर, अंधेरी पश्चिममधून अशोक जाधव, चांदिवलीमधून मोहम्मद आरिफ खान, चेंबूरमधून चंद्रकांत हंडोरे, वांद्रे पूर्वमधून झिशन सिद्दीकी, धारावीमधून वर्षा गायकवाड, सायन कोळीवाडातून गणेश यादव, मुंबादेवीमधून अमिन पटेल, कुलाबामधून अशोक जगताप यांना तर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून रोहित साळवे, मीरा भाईंदरमधून सय्यद हुसैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या सुकाणू समितीची (कोअर) बैठक सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोन नेते उपस्थित आहेत. या बैठकीत युतीच्या निर्णयासंबंधी घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपची दिल्लीत बैठक सुरू असताना शिवसेनेने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे भाजप काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.

शिवसेनेने पहिल्या यादीत शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील चारही आमदारांना एबी फॉर्म देण्यात आले आहे. यामध्ये सिन्नरमधील राजाभाऊ वाजे, मालेगावमधून दादा भुसे, निफाडमधून अनिल कदम आणि देवळालीमधून योगेश घोलप यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. तसेच संजय घाटगे (कागल), संग्रामसिंह कुपेकर (चंदगड), राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), चंद्रदीप नरके (करवीर), डॉ. सुजित मिचणेकर (हातकणंगले), सत्यजीत पाटील (शाहुवाडी), प्रकाश आबिटकर (राधानगरी), उल्हास पाटील (शिरोळ) यांचा समावेश आहे. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातून संजय शिरसाट, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना संधी देण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दरम्यान वरळी मधून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तसेच माहीम येथून सदा सरवरणकर यांना, भायखळा मधून यामिनी जाधव, तर शिवडी मधून अजय चौधरी यांना शिवसेनेमार्फत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपाची मात्र दिल्लीत अजूनही बैठक सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील इत्यादी नेते उपस्थित आहेत. भाजपा अजूनही इन कमिंगमध्ये गुंतला आहे असे दिसते. उद्या बारामतीतून गोपीचंद पडाळकर यांना प्रवेश देऊन अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांना उमेदवारी मिळू शकते तसेच कोकणातील हेविवेट नेते नारायण राणे यांचा प्रवेश दोन ऑक्टोबर ला मुंबईत होवू शकतो.