भाजपाची चौथी यादी जाहीर; खडसेना दिलासा

मुंबई: भाजपनं सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यात मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. बंडाच्या पवित्र्यात असलेल्या खडसे यांना तिकीट न देण्याचा शब्द भाजपनं खरा करून दाखवला आहे. मात्र, त्यांचं बंड थोपवण्यासाठी त्यांच्या जागी कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतील बोरीवली, कुलाबा व घाटकोपर पूर्व या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना पुन्हा संधी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवे चेहरे देण्यात आले आहेत. बोरीवली येथून भाजपने सुनील राणे यांना तिकीट दिलं आहे. एसआरए घोटाळ्यात नाव असलेल्या प्रकाश मेहता यांना डावलून घाटकोपर पूर्वमधून नगरसेवक पराग शहा यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. कुलाबा मतदारसंघातून पुरोहित यांच्याऐवजी विधानपरिषदेचे सभापती व राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे.