
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गात भाजप शिवसेनेची युती नाही, असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे स्पष्ट केले. कणकवलीच्या जागेवर शिवसेनेने भाजपच्या विरोधात उमेदवार दिल्याने जिल्ह्यात युती तुटल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सिंधुदुर्गात शिवसेनेने युती धर्म पाळला नाही. कणकवलीच्या जागेवर शिवसेनेने आपला उमेदवार दिला आहे. सेनेकडून सतीश सावंत यांनी आज अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री जठार यांनी ही माहिती दिली. श्री. जठार म्हणाले, सावंतवाडीत विधानसभा मतदारसंघात राजन तेली यांना भाजपने जाहीर पाठिबा देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात दत्ता सामंत यांना भाजपने पाठींबा देखील जाहीर केला आहे. शिवसेनेच्या उमेदवारा विरोधात प्रचार करा, असे आदेश भाजप कार्यकर्त्यांना आज देण्यात आल्याचे श्री. जठार यांनी सांगितले.
एकूण कोकणात निवडणूक घुमशान बघायला मिळणार. काल झालेल्या युतीच्या संयुक्त परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते की, बंडखोरी दोन दिवसांत मोडून काढू व दोन्ही पक्षामार्फत युतीचा धर्म पाळला जाईल परंतु सिंधुदुर्गात तरी सध्या चित्र वेगळेच दिसत आहे.






