
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरित्या भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा केली.
हिंदुत्वाचा धागा भाजप आणि शिवसेनेला जोडणारा आहे. त्यामुळे महायुती व्हावी अशी तमाम जनतेची अपेक्षा होती आणि त्यानुसारच आमची युती झाली आहे, असे सांगताना महायुतीत सगळ्यांनाच काही प्रमाणात कॉम्प्रमाइज करावं लागलं आहे. युतीसाठी ते करावंच लागतं, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. पुढच्या दोन दिवसांत सगळ्या बंडखोरांना माघार घ्यायला लावणार आहोत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ऐकतील व बंडखोरी राहणार नाही, असे आम्हाला वाटते. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महायुतीत शिवसेनेला १२४ जागा देण्यात आल्या आहेत. शिवाय भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेच्या दोन जागा शिवसेनेला मिळणार आहेत. अन्य घटकपक्षांना १४ जागा सोडण्यात आल्या आहेत आणि उरलेल्या १५० जागा भाजप लढत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे हे लवकरच आमच्यासोबत विधानसभेत दिसणार आहेत. त्यांचं मी स्वागत करत आहे, असे नमूद करताना आदित्य हे मुंबईतून सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
आकड्यांवर सर्व काही अवलंबून नसतं. मनापासून युती झाल्यानंतर पुढच्या गोष्टी आपापसात बसून ठरवता येतात. दोन्ही पक्ष समजूतदार आहेत. त्यामुळे लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण याचा विचार करत बसण्यापेक्षा दोन्ही भाऊ एकत्र पुढे चालले आहेत. आमच्यात ज्या गोष्टी ठरल्यात त्या मी येथे उगाळत बसणार नाही, असे उद्धव म्हणाले.






