शिवसेना दसरा मेळावा; टीका आणि गर्जना – शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन

मुंबई: दरवर्षी प्रमाणे यंदाही दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेचा मेळावा पार पडला. विधानसभेच्या तोंडावरच मेळावा असल्याने शिवसेनेने यानिमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात शिवसेनेचा निवडणूक जाहीरनामाघोषित केला.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच अजित पवार यांच्या राजीनामा नाट्याचा आणि शरद पवार यांच्या ईडी नोटीस प्रकरणावरही टीका करून खरपुस समाचार घेतला.

शिवाजी पार्क मैदानात राज्यभरातून हजारोंच्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांच्या साक्षीनेच उद्धव ठाकरे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करत विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी मी निघालो आहे, अशी गर्जना केली. असा क्वचितच योग येतो. या एकाच महिन्यात दोन विजयादशमी आहेत. आज पहिली विजया दशमी आहे आणि दुसरी येत्या २४ तारखेला निवडणुकीच्या निकालाने साजरी होणार आहे, असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात सर्वत्र दहा रुपयांत चांगल्या जेवणाची थाळी देणार, ३०० युनिटपर्यंतचा विजेचा दर ३० टक्क्यांनी कमी करणार आणि सदृढ महाराष्ट्र घडवण्यासाठी एक रुपयात गावोगावी आरोग्य चाचणी केंद्रे उभी करणार, अशा लोकप्रिय घोषणांचा पाऊस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावरील शिवसेनेच्या ऐतिहासिक दसऱ्या मेळाव्यातून पाडला.

पचस्तीस मिनिटाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी खालील मुद्याना हात घातला

कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती हा आमचा शब्द आहे. शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करणार.

शाळा आणि गावातील अंतर जास्त असते. या वाटेत अनुचित प्रकार घडलेत. हे प्रकार आम्ही थांबवणार आहोत. त्यासाठी गावोगावी बससेवा सुरू करण्याचे आम्ही ठरवले आहे.

देशात घुसलेल्या बागंलादेशी घुसखोरांना हाकलून लावा. 

समान नागरी कायदा आणा ही आमची मागणी आहे. जात-पात-धर्म आम्ही काहीही मानत नाही. समान नागरी कायदा केंद्र सरकारने करावा. 

कलम ३७० रद्द करणे हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होते, ते पूर्ण झाले. आता राममंदिराचे बाळासाहेबांचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत.

Source: News 18 Lokmat