

मुंबईः टोलमुक्त महाराष्ट्र करू असं भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं. कुठं झाला महाराष्ट्र टोलमुक्त?, राज्यात जे ७८ टोल बंद झाले ते फक्त मनसेने केलेल्या आंदोलनामुळे आणि दणक्यामुळे बंद झाले, असे सांगत मुंबईत त्रिभाषासूत्र ठीक आहे. पण, मुंबईत चौथी भाषा आणायचा प्रयत्न केला तर मनसे त्यांना बांबूचे फटके देईल, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या फोटोसह शिवसेना कार्यकर्त्याने वरळीत गुजराती, तमिळ भाषामधील पोस्टर्स लावले होते. मराठीचा कैवार घेणारा आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला गुजरातीमधून पोस्टर्स लावण्याची वेळ का आली, असे म्हणत सेनेवर सर्वच स्तरांतून सोशल मीडियात टीका झाली होती. सोशल मीडियावर टीका झाल्याने शिवसेनेवर अखेर ते पोस्टर्स काढण्याची नामुष्की आली होती. आज राज ठाकरे यांनी मराठी मुद्द्याला हात घालीत मुंबईत चौथी भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. मुंबईत, मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषा ठीक आहे. पण चौथी भाषा कुणी आणत असेल तर त्यांना बांबूचे फटके दिले जाईल, असे राज ठाकरे यांनी आज भांडूपमधील सभेत सांगितले. विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या मनसेने प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे.






