नवी मुंबईतील सेनेचे बंडखोर नेते विजय माने यांची माघार; मंदा म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर

नवी मुंबई(प्रतिनिधी) : नवी मुंबई शहरातील बेलापूर आणि ऐरोली हे विधानसभा महायुतीच्या घोषणेनंतर भाजपच्या पारड्यात पडल्याने शिवसेना एका विधानसभेसाठी आक्रमक झाली होती. राजीनामा सत्र आणि आंदोलन करत शहरप्रमुख विजय माने यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन बंडखोरीचा झेंडा फडकावत बेलापूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.मात्र सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी माने यांची शिवसेना पद्धतीने समजूत काढल्यावर विजय माने यांनी आपल्या बंडाची तलवार म्यान केली आहे. 

विजय माने यांनी भाजपला पाठिंबा देताना मंदा म्हात्रे यांच्यापेक्षा आपल्याकडे अधिक संपत्ती असल्याचा दावा करून या माघारीत कोणतीही राजकीय तडजोड झाली नसल्याचा दावा करताना कुठलाही अर्थपूर्ण व्यवहारही झाला नसल्याचे पत्रकारांशी बोलताना माने यांनी स्पष्ट केले. माने यांनी लोकांकडून जमा झालेले ४ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची घोषणा केली आहे. दरम्यानच्या काळात विजय माने यांना पालक मंत्री एकनाथ शिंदे विरोधीपक्ष नेते विजय चौगुले ,उपनेते विजय नाहटा या नेत्यांनी समजूत काढल्यावर अखेर माने यांनी वडार भवन मधील पत्रकार परिषदेमध्ये आपला पाठिंबा मंदा म्हात्रे यांना दिला. एकनाथ शिंदे यांनी हकालपट्टी करण्याचा इशारा देण्याबरोबर आपल्या पद्धतीने विजय माने यांची समजूत काढली. लोकवर्गणी मधून गोळा केलेले पैसे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.