भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर

भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अभिजीत बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी एस्थर डफलो यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासह मायकल क्रेमर यांनाही संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

बॅनर्जी यांनी १९८१ मध्ये कोलकाता युनिव्हर्सिटीमधून विज्ञान शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले, त्यानंतर १९८३ मध्ये जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतून एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. १९८८ मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली. भारतातल्या विकलांग मुलांना चांगलं शिक्षण कसं देता येईल, यासाठी अभिजीत बॅनर्जी यांनी एक संशोधन पेपर लिहिला होता. 

नोबेल समितीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की या अर्थशास्त्रज्ञांच्या संशोधनातून गरीबीचं उच्चाटन करण्यात मदत मिळत आहे.