
सातारा: सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी आहे. दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडणे सुरू आहेत, असं सांगतानाच जे पक्ष आपआपसात भांडण करतात ते सत्ता कशी चालवणार? काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी आहे. त्यांच्यात फूट पडलेली आहे. ते राज्याला काय दिशा देतील? असा सवाल करताना फूट पाडा आणि मलई खा हा एकमेव कार्यक्रम असणाऱ्यांना निवडून देणार का? असा सवालही मोदींनी केला.
त्यानंतर त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांची जंत्री सादर करतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. विरोधक राफेलबाबत अपप्रचार करतात तेव्हा देशासाठी वीरपूत्र देणाऱ्या साताऱ्यातील या पिढीला वेदना होतात. ३७० कलमला विरोध होतो, सावरकरांची बदनामी केली जाते तेव्हा साताऱ्याचा पारा चढतो, असं मोदी म्हणाले.






