वार-प्रतिवार: शहा यांनी मुख्यमंत्रीबाबत शिवसेनेला शब्द दिलाच नव्हता – देवेंद्र फडणवीस; शहा आणि कंपनी खोटारडी – उद्धव ठाकरे

मुंबई: राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला. माझ्यासमोर युतीची चर्चा झाली तेव्हा शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याचा विषय झाला नव्हता. उलट शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याची बोलणी फिस्कटली होती. त्यानंतर चर्चा थांबवल्या गेली. नंतर चर्चा जेव्हा सुरू झाली. तेव्हा माझ्यासमोर अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याबाबतचं ठरलं नव्हतं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात हा वाद झाला असावा म्हणून मी शहांना याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनीही उद्धव ठाकरेंना असा कोणताच शब्द दिला नव्हता असं स्पष्ट केलं असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

खरंतर युतीतील गैरसमज आपआपसातल्या चर्चेतनं संपवणं शक्य होतं. मात्र शिवसेनेने त्यादृष्टीने तशी भूमिका घेतली नाही, असा आरोपही त्यांनी केला. 

निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्यात पारदर्शी सरकार देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. शिवसेनेशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण शिवसेनेनेच आमच्याशी चर्चा करणं थांबवलं, असं सांगतानाच मी स्वत: राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि एका पक्षाचा नेता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेकवेळा फोन केले. पण उद्धव ठाकरे यांनी माझा एकही फोन घेतला नाही, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधाताना फडणवीस यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यावर हा आरोप केला.

शहा आणि कंपनी खोटारडी – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर कडाडून हल्ला केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या आरोपाचा समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शहा यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी मला उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला होता. त्याला आम्ही नकार देताना उपमुख्यमंत्रिपदासाठी आम्ही लाचार नाही, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर शहांनी ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री करू असं सांगितलं. त्यालाही मी नकार दिला. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसण्याचं वचन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिल्याचं मी शहांना सांगितलं. त्यावर तुम्हाला काय पाहिजे? असा सवाल शहांनी केला. तेव्हा पद, जबाबदाऱ्या आणि अधिकाराचं समसमान वाटप झालं पाहिजे, असं मी शहांना सांगितलं. शहांनी ते मान्यही केलं. त्यानंतर आम्ही मातोश्रीतील शिवसेनाप्रमुखांच्या रुममध्ये बसलो होतो. त्यावेळी माझ्यामुळे युतीत तणाव निर्माण झाला, आता मला हे संबंध चांगले करायचे असल्याचं शहा म्हणाले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला आता जाहीर न करण्याची विनंती केली. पक्षात अडचण निर्माण होऊ शकतो. माझ्या पद्धतीने नंतर पक्षातील नेत्यांना समजावतो, असं फडणवीस म्हणाले होते, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराणं संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आमचा ठाकरीबाणाही जनतेला माहित आहे. ठाकरे घराण्यावर पहिल्यांदाच कुणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या वक्तव्याचा आधार घेऊन आम्हाला खोटं ठरवलं आहे. शहा आणि कंपनीने कितीही खोटेपणाचा आरोप केला तरी खोटं कोण आणि खरं कोण हे सर्वांना माहित आहे. शहा आणि कंपनीच खोटारडी असून अशा लोकांसोबत राहायचं नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर प्रतिवार केला.