आम्ही विरोधी पक्षात बसू, साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीचा योग्य सन्मान राखू – शरद पवार

मुंबई: साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीचा सन्मान आम्ही कायम ठेवू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार. जनतेनं विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलाय, असंही ते म्हणाले. २२० के पार’ चा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरलाय. सत्तेचा गैरवापर आणि काहीही बोलायचं हे जनतेला पटलेलं नाही. जनतेनं सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

वैयक्तीक टीका करून विद्वेषाचं राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपने केला. तसंच ईडीसारख्या संस्थांचा दुरुपयोग करून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. हे या निवडणुकीतून जनतेनं सत्ताधाऱ्यांना दाखवून दिलं, असं पवार म्हणाले. ३७० कलमला पक्षाचा विरोधच नव्हता. पण त्यावरून विरोधकांना ‘डुब मरो जाओ’ अशी भाषा पंतप्रधानांनी करणं योग्य नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना शोभत नाही असे पवार म्हणाले.

साताऱ्याला जाऊन विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील यांची भेट घेणार आहे. तसंच तिथल्या जनतेचा आभार मानण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्याच साताऱ्याला जाण्याचा प्रयत्न करणार आहे, असं पवार म्हणाले.