सत्ता स्थापना लांबणीवर; शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी ठाम

मुंबई: सत्ता स्थापन करण्यासाठी काय फॉर्म्युला असावा यासाठी शिवसेना आमदारांची मातोश्रीवरील बैठक संपली असून अडीच वर्षे मुख्यमंत्री पद या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. तसेच जनतेतून निवडून आलेल्या आमदारांना मंत्री पदं मिळावी अशी मागणी नवनिर्वाचित आमदारांनी केल्याने उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केलीय. यामुळे ऐन दिवाळीत महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपकडून लेखी पत्र घेतल्याशिवाय पुढचा निर्णय घेऊ नये, अशीही मागणी शिवसेनेतून करण्यात आलीय. भाजप ठरल्याप्रमाणे वागली नाही तर इतर पर्याय खुले असल्याचं उद्धव ठाकरे आमदारांना संबोधित करताना म्हणाले.

सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार आमदारांनी उद्धव ठाकरे यांना दिलेत, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर दिली. दरम्यान प्रत्येक पक्षात कार्यकर्ते मागणी करत असतात शिवसेना भाजपाच्या नेत्यांमध्ये दिवाळी नंतर बैठक घेतली जाईल आणि नंतर सत्ता स्थापन करण्याबाबत सूत्र ठरविले जाईल असे रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे सत्ता स्थापना लांबणीवर जाणार हे मात्र नक्की.