
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून त्यामुळे महायुतीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून मुख्यमंत्री आमचाच भाजपाचा असेल असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होणार की शिवसेनेचा होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान राजकीयदृष्ट्या फारच महत्त्वाचं मानलं जात आहे. राज्यात आम्ही पुन्हा एकदा स्थिर सरकार देणार असून युतीचे हे सरकार ५ वर्षे भाजपच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे, असे सांगून फडणवीस यांनी ५ वर्षे मुख्यमंत्रिपद भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
दिवाळीनंतर सत्तास्थापनेसाठी आवश्यक पावले उचलली जातील, असेही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले.






