संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली – चंद्रकांत पाटील

मुंबई : शिवसेनेची संजय राऊतांनी वाट लावली. संजय राऊतांच्या तोंडात पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा शोभत नाही. खंजीर त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खुपसला आहे. शिवसैनिक त्यासाठी त्यांना माफ करणार नाहीत. त्यांनी किती टोकाची भाषा गेल्या महिनाभरात केली, ते राज्यातली जनता पाहात होती. आम्ही मातोश्रींची गरिमा राखली. आमचे नेते उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीला जात होते. पण उद्धवजींना मातोश्री सोडून सिल्व्हर ओक हे शरद पवारांचं निवासस्थान गाठावं लागलं. तेही एकवेळ ठिक होतं, पण हॉटेलमध्ये जावं लागलं. आम्हाला याची लाज वाटते. ही वेळ राउतांनी शिवसेनेवर आणली, अशा शब्दात पाटील यांनी राऊत यांच्यावर टीका केली.

शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या हट्टापायी हिंदुत्व सोडलं, शिवाजी महाराजांना सोडलं. राज्यातल्या दुष्काळग्रस्त जनतेच्या भावनांचा विचार केला नाही. शिवसेनेच्या या आततायीपणाला शिवसेना नेते संजय राऊत जबाबदार आहेत. संजय राऊतांना शिवसेनेची वाट लावली, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करत संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला.