पुढील चोवीस तास अजून मुसळधार; मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात वाहतूक कोंडी.

मुंबई: काहीशा विश्रांतीनंतर सोमवारपासून पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली. काही तासांच्या संततधार पावसाने रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक सखल भागात पाणी साचले.

नवी मुंबई आणि ठाणे येथे अक्षरशः पावसाने झोडपून काढले. सायन – पनवेल महामार्गावर पाणी साचून नद्या प्रमाणे वाहत होते. महामार्गावर तुंबलेल्या पाण्यामुळे गाड्यांची लांबलचक लाईन लागली होती आणि रस्ता वाहतूक मंदावली होती.

९ जुलै रोजीही ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या २४ तासांत बरसणारा हा पाऊस जोरदार असला तरी तो संततधार नसेल, अधूनमधून विश्रांती घेत तो बरसणार असल्याची वेधशाळेची माहिती आहे.