
कोलकाता : ईडन गार्डन्सवरील ऐतिहासिक कसोटीचा पहिला दिवस भारताच्याच नावावर राहिला. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा बांगलादेशचा निर्णय त्यांच्याच फलंदाजांनी चुकीचा ठरवला. कारण, बांगलादेशचा संपूर्ण संघ १०६ धावात माघारी परतला. यानंतर भारताने पहिल्या डावात ३ बाद १७४ धावा केल्या.
ईशांत शर्मा पहिल्या दिवसाचा हिरो ठरला, ज्याने २२ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या. यानंतर फलंदाजांनी धुरा खांद्यावर घेतली. चेतेश्वर पुजारा ५५ आणि त्यानंतर विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत भारताला मजबूत स्थितीत आणलं.
फलंदाजीसाठी उतरलेल्या विराट कोहलीने सर्वात वेगवान ५ हजार कसोटी धावा करणारा सहावा कर्णधार होण्याचा मानही मिळवला. याशिवाय केवळ ८६ डावांमध्येच ५ हजार धावांचा टप्पा त्याने गाठला आहे. ईशांत शर्माने २००७ नंतर पहिल्यांदाच एका डावात ५ विकेट्स घेतल्या.











