महाराष्ट्रावर केंद्राचा फर्जीकल स्ट्राईक, रात्रीस खेळ चाले – उद्धव ठाकरे

मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी अजित पवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. या सत्ता स्थापनेनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी भाजप नेत्यांवर टीका करीत फडणवीस यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही, असे सांगितले. शरद पवार यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपने राजकारणाचा खेळखंडोबा चालवला आहे. मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…असं म्हणणाऱ्या व्यक्तीन मी खूर्चीवरून जाणारच नाही, असे म्हणावे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. शिवसेनेने आतापर्यंत उघडपणे राजकारण केले आहे. रात्रीस खेळ चाले याप्रमाणे भाजपला सत्ता स्थापन करण्याची सवय झाली आहे. हरयाणा, बिहारमध्ये भाजपने जे काही केले आहे तेच त्यांनी महाराष्ट्रात केले आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.