
मुंबई: महाराष्ट्र सत्ता स्थापन नाट्याला संपलं संपलं असं म्हणत असताना प्रत्येक तासागणिक एक नवीन वळण घेत आहे. अजित पवार यांनी बंड करून आज सकाळी नाट्यमय रीत्या राजभवनावर राज्यपालांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर उपुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अख्या देशाला बुचकळ्यात पाडल्यानंतर दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की, अजित पवार यांचा भाजपासोबत शपथ ग्रहण कार्यक्रम हा व्यायक्तीत निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या निर्णयाला पाठिंबा नाही असेही पवार म्हणाले होते.
दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व आमदारांची बैठक घेऊन विधिमंडळ नेतेपदी जयंत पाटील यांची निवड करण्यात आली तसेच अजित पवार यांची विधीमंडळ गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घटनात्मक सर्व अधिकार जयंत पाटील यांना देण्यात आले आहे. बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. पक्षादेश किंवा व्हीप काढण्याचे सर्व अधिकार जयंत पाटील यांना बहाल झाले आहेत.






