महाविकास आघाडीचं सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई: आमच्याकडे बहुमतासाठी आवश्यक किमान १४५ आमदारांचे पाठबळ असताना आणि आम्ही सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असताना राज्यपालांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करणे आणि शपथग्रहण सोहळा आयोजित करणे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे’, असे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेत नमूद करणात आले आहे. याचिकेत राज्यपालांच्या निर्णयाच्या वैधतेल आव्हान देण्यात आले आहे. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या सरकारला तात्काळ विशेष विधिमंडळ अधिवेशन घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही तिन्ही पक्षांनी या याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाला केली आहे.राज्यपालांनी मनमानी पद्धतीने पावलं उचलल्यानेच आम्हाला घटनेच्या कलम ३२ नुसार रिट याचिका दाखल करावी लागत आहे, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे बहुमत असून आमच्या आघाडीला सत्तास्थापनेचं निमंत्रण देण्याचे निर्देश राज्यपालांना द्यावेत, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.

या याचिकेवर आज रात्रीच तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती तिन्ही पक्षांकडून करण्यात आली आहे. याचिकेत केंद्रीय गृहमंत्रालय, महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.