महाराष्ट्र सत्ता नाट्य: उद्या पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनवणी सुरू राहणार

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तापेचावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून हा पेच अद्याप न सुटल्याने सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. उद्या सकाळी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सर्व पक्षकारांना सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी केली आहे.

सुप्रीम कोर्टात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी मांडली तर भाजपकडून मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. कर्नाटकाचा हवाला देत अभिषेक मनू सिंघवी आजच बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने द्यावेत, तसेच गुप्त मतदानाऐवजी थेट मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली. ही मागणी त्यांनी वारंवार केली. राज्यपालाकडून शपथ देण्याची घाई करण्यात आली असून राज्यपाल कोणाच्या इशाऱ्यावर काम करतेय, असा प्रश्न सुप्रीम कोर्टात उपस्थित केला. घोडेबाजार रोखण्यासाठी आजच बहुमत चाचणी घ्यायला हवी, असा आग्रह या दोन्ही वकिलांनी कोर्टात धरला.