
कोलकाता: पहिल्या वहिल्या डे नाईट गुलाबी कसोटीत भारताने वरचष्मा कायम राखला आहे. बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवरच आटोपला होता. कर्णधार विराट कोहली १३६, अजिंक्य रहाणे ५१ यांच्या खेळीच्या बळावर भारताने ९ बाद ३४७ धावांवर डाव घोषित केला. यानंतर भारतीय वेगवान गोलंदाजांनी पुन्हा एकदा कमाल दाखवली आणि बांगलादेशला जेरीस आणलं.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतीय फलंदाजांनी केली. १७४ धावांपासून पुढे भारताचा डाव सुरू झाला आणि कर्णधार-उपकर्णधाराने अनुक्रमे शतक आणि अर्धशतक पूर्ण केलं. विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील २७ वं शतक पूर्ण केलं. कर्णधार म्हणून हे त्याचं २० वं शतक आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतकं ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मात्र बांगलादेशचा फलंदाज मुशफिकुर रहिमने संघर्ष करत टिच्चून फलंदाजी केली. १३ धावसंख्येवर चार विकेट्स गमावल्यानंतर बांगलादेशची लढाई संपल्यात जमा होती. पण रहिमने संघर्ष करत दुसऱ्या दिवसाचा खेळ होईपर्यंत सहा बाद १५२ पर्यंत मजल मारुन दिली. तरीही बांगलादेश भारतापेक्षा अजून ८९ धावांनी पिछाडीवर आहे. तर भारताला विजयासाठी केवळ ४ विकेट्सची आवश्यकता आहे.






