
कोलकाता: ईडन गार्डन्सवरील डे-नाईट कसोटीत तिसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा कायम राहिला. दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा फलंदाज मुशफिकुर रहिमने संघर्ष करत टिच्चून फलंदाजी केली. १३ धावसंख्येवर चार विकेट्स गमावल्यानंतर बांगलादेशची लढाई संपल्यात जमा होती. पण रहिमने संघर्ष करत दुसऱ्या दिवसाचा खेळ होईपर्यंत सहा बाद १५२ पर्यंत मजल मारुन दिली होती. आज तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यानंतर बांगलादेशच्या एकाही खेळाडूला चांगली धावसंख्या उभारता आली नाही. ४१ व्या षटकात अल अमीन २१ धावा काढून बाद झाला. बांगलादेशचा नववा खेळाडू बाद झाल्यानंतर भारताला विजय मिळाला. शनिवारी जखमी झालेला महमदुल्लाह फलंदाजी करण्यसााठी मैदानात उतरला नाही. उमेश यादवने भारताकडून सर्वात जास्त ५ गडी केले.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने अवघ्या तिसऱ्या दिवशी दणदणीत विजय मिळवला आहे. २ कसोटीच्या मालिकेत भारताने दोन्ही कसोटी सामने जिंकून ही मालिका २-० ने आपल्या खिशात घातली आहे. भारताचा गोलंदाज उमेश यादवने ५३ धावा देऊन ५ गडी बाद केले. तर पहिल्या डावात वेगवान गोलंदाज इशांत शर्माने ५ विकेट घेतले होते.






