तीन दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पायउतार, शरद पवार पुन्हा पॉवरफुल

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी आज पुन्हा नाट्यमय वळण घेतलं. राष्ट्रवादीतून फुटून भाजपशी हातमिळवणी करणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आमदारांनी सोडलेली साथ आणि पवार कुटुंबीयांच्या मनधरणीनंतर अजितदादांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरलं नाही, त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच नवं सरकार बनविणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा. असे मुखयमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवलं होतं. त्यामुळे अजित पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा एक गट आमच्याकडे आल्याने आम्ही त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार बनवले. आज सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश आम्हाला दिले. मात्र, आज सकाळी अजित पवार मला भेटले आणि त्यांनी काही कारणामुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलं.