
मुंबई: आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या सर्व नवनिरवाचित आमदारांनी एकजूट राहण्याची शपथ घेतली आणि जोरदार शक्ती प्रदर्शन केले. हॉटेल ग्रँड हयातमध्ये तिन्ही पक्षाच्या १६२ आमदारांची परेड करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच तिन्ही पक्षाचे नेते आणि आमदार एकत्र एकवटले होते.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकाच मंचावर आले होते. यावेळी मंचावर संविधान ठेवण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी यावेळी प्रस्तावना केली. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आमदारांना एकजूट राहण्यासाठी संविधानाची शपथ दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे नेते अबू असीम आझमी, शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली. पण हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. आमच्यावर काही चुकीचं लादलं तर त्याला उत्तर देण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे, असा सज्जड दम शरद पवार यांनी दिला. याशिवाय कुणी आडवा आला तर त्याचं काय करायचं हे शिवसेना पाहून घेईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
आम्ही एक महिन्यापूर्वीच गटनेते पदाची निवड केली, पण अजित पवार तिकडे गेले. त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना व्हिपचा अधिकार आहे, याची भीती नवीन सदस्यांना दाखवली जात आहे. आदेश देण्याचा अधिकार निलंबित केलेल्या नेत्याला नसतो. ज्याला सदस्यत्व जाण्याची भीती आहे, त्यांची मी स्वतः जबाबदारी घेतो. कुणीही संभ्रमात पडू नये. हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. इथे काहीही खपवून घेतलं जात नाही. आपण योग्यला योग्य म्हणतो, जे योग्य नसताना लादण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला धडा शिकवण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे. आता आपल्यासोबत शिवसेना आहे, त्यामुळे धडा शिकवण्याबाबत जास्त बोलण्याची गरज नाही,’ असं शरद पवार म्हणाले.






