
सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावर साताऱ्याजवळ आणेवाडी टोलनाका आहे. या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडून इथं टोलवसुली केली जाते. मात्र, टोलच्या बदल्यात वाहनधारकांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. महामार्गावर शौचालयांची सोय नाही. अपघात झाल्यास प्राथमिक उपचाराच्या सुविधा नाहीत. शिवेंद्रराजे यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाचं याकडं लक्ष वेधलं होतं. तसंच, महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी त्यांना १५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र, प्रशासनाकडून काहीच हालचाल केली गेली नाही. त्यामुळं संतापलेल्या भोसले यांनी आज आक्रमक आंदोलन करून टोलनाका बंद पाडला. शिवेंद्रराजे भोसलेंच्या आंदोलनानंतर सध्या दोन्ही बाजूंची टोलवसुली बंद आहे.






