मनसेचे हल्लाबोल आंदोलन वाशी विभाग कार्यालयावर मनसेची धडक , नागरी समस्यां संदर्भात विचारला जाब

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी विभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी येथील मनपा विभाग कार्यालयावर धडक दिली. सदर मोर्चाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली .यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक व नागरिक उपस्थित होते. मनसे पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी छायाचित्रांसहित नागरी समस्यांचा पाढाच विभाग अधिकारी मंगेश हंशेट्टी यांच्यासमोर वाचला. यावेळी विभाग अधिकाऱ्यांविरोधात “या अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोकं वरती पाय..”, “परत करा आमचे फुटपाथ, नका करू हाथ साफ…”, “श्रीमंत आमची पालिका, मग रस्त्यांचे हाल का ?….”, “पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे…..”, “बंद करा भ्रष्टाचार फुटपाथ वर आमचा अधिकार….” या घोषणा देऊन मनसैनिकांनी हल्लाबोल करून परिसर दणाणून सोडला.

नेरुळ विभाग कार्यालय व कोपरखैरणे विभाग कार्यालयांवरील आंदोलनांनंतर नागरी समस्यांबाबत नवी मुंबई मनसेचे हे तिसरे आंदोलन होते.

गेल्या कित्येक दिवसांपासून वाशी विभागातील नागरिकांना विविध समस्यांनी पछाडले आहे. या नागरी समस्यांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांवरील खड्डे, उखडलेले पदपथ, बंद अवस्थेतील पथदिवे व हायमास्ट, दुकानदारांनी अवैधरित्या अडवलेली मार्जिनल स्पेस, मिनी सी-शोअरचे सुशोभीकरण, पदपथ व रस्ते अडवून बसलेले अनधिकृत फेरीवाले व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कधीही न पाहवयास मिळणारी औषध व धूर फवारणी, उद्यानांची व मैदानांची झालेली दुरावस्था, अनधिकृत गॅरेजेस व त्यांची रस्त्यांवरील बेवारस वाहने, वाशी सेक्टर-१७ येथील नाल्यामधून होणारी दुर्गंधी अशा अनेक समस्यांमुळे नागरिक बेजार झाल्याचे मनसे विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते व आनंद चौगुले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या नागरी समस्यांकडे महानगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसेने प्रसिद्धीपत्रकात केला आहे. यामध्ये कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे साटेलोटे देखील असल्याची शंका मनसेने व्यक्त केली आहे. तरी या समस्या येत्या दहा दिवसांच्या आत मार्गी न लावल्यास महापालिका व अधिकाऱ्यांविरोधात खळ-खट्टयाक आंदोलन करण्याचा इशारा सचिव विलास घोणे व शहर सह-सचिव अमोल इंगोले यांनी दिला आहे.

याप्रसंगी मनसेची आक्रमकता पाहून विभाग अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत मनसेच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी मनसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे, निलेश बाणखेले, सविनय म्हात्रे, प्रसाद घोरपडे, सचिव विलास घोणे, सचिन कदम, वाहतूक सेनेचे नितीन खानविलकर, सह-सचिव अमोल इंगोले, आनंद चौगुले, दिनेश पाटील, शशिकांत कळसकर, महिला उपशहर अध्यक्षा अनिथा नायडू, महापालिका कर्मचारी सेनेचे अभिजीत देसाई,अमोल आयवळे, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे, सनप्रीत तूर्मेकर विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते, विक्रांत मालुसरे, अशोक भोसले, दीपाली धऊल, अरुणा राठोड, यशोदा शिंदे, श्याम ढमाले, योगेश शेटे, विनोद पाखरे, अनिकेत भोपी, अरुण पवार, ,मयुर चव्हाण, प्रेम जाधव, प्रशांत पाटेकर, राजीव गावडे, अनिल सौदागर, बाळकृष्ण इचके, गणेश थेवर, अमोल बनसोडे, महादेव सोलके, विशाल भणगे, मिथेश तावडे , रोहित किटो, दीपक डिगेकर, इम्रान शेख, किरण चिपळूनकर व मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.