Maharashtra Unlock : महाराष्ट्र सरकारची नवी नियमावली जाहीर

महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) नुकतीच अनलॉकबाबतची नवी नियमावली जाहीर केली असून जवळपास 25 जिल्ह्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. या नव्या नियमावलीनुसार, राज्यात सोमवार ते शनिवारपर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्या भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्या ठिकाणी कोरोनाचे निर्बंध कायम असणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर असून नुकताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटले की, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी आहे, तेथे दुकाने आता रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील. यासंदर्भात सरकार लवकरच आदेश जारी करेल. तसेच कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे ज्या ठिकाणी निर्बंध शिथिल केले जात नाहीत, तेथील नागरिकांनी सरकारला सहकार्य करण्याचे उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी मुंबई लोकलबाबतही भाष्य केले आहे. पहिल्या टप्प्यात सर्व लोकांना मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देणे कठीण होईल. कारण, हळूहळू निर्बंध कमी केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.