
नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार ८ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. तर ११ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. ७० मतदारसंघ असलेल्या दिल्ली विधानसभेची मुदत २२ फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे.
आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दिल्लीत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी असेल. २२ जानेवारीपर्यंत या अर्जांची छाननी होईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २४ जानेवारी असेल.





