डॉक्टर दाम्पत्यांचे कौतुकास्पद कार्य

मुलाचा वाढदिवस साजरा केला आदिवासी पाड्यातील मुलांसोबत

मुंबई: मुंबईतील उपनगरात राहणारे आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रभागी असणारे डॉक्टर दाम्पत्य डॉ गीतांजली महाडिक आणि डॉ अभिजित महाडिक यांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा केला. आपल्या मुलाच्या वाढदिवसाला वंचित व आदिवासी दुर्गम भागातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसावे म्हणून त्यांनी मुलाचा वाढदिवस बोरिवलीच्या पुढे असणाऱ्या आदिवासी पाड्यात जावून तेथील मुलांसोबत वाढदिवस साजरा केला. संस्थेने दत्तक घेतलेल्या पाड्यात जावून सदर कल्पना राबविली याप्रसंगी प्रगती फाऊंडेशन संस्थेचे विभागीय अधिकारी श्री प्रणय ढमाळ उपस्थित होते.

डॉ गीतांजली महाडिक या मुंबईतील उपनगरात भांडूप येथे राहणाऱ्या असून त्या मुंबईतील सामाजिक संस्था प्रगती फाऊंडेशनचे विश्वस्त ही आहेत. डॉ. अभिजित महाडिक हे देखील डॉक्टर असून ते मराठी सिने मालिका अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेत. आपण समाजाला देणे लागतो याचे भान ठेवून या दोन्हीं उभयतांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस आदिवासी मुलांना भेट वस्तू व खाद्य पदार्थ वाटून साजरा केला. त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, “संस्थेच्या माध्यमातून ते अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करीत असतात परंतु आजच्या आनंदाच्या क्षणी जर का आम्ही वंचित, गरीब व दुर्गम भागातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात यशस्वी झालो तर ते माझ्या मुलासाठी सगळ्यात मोठे गिफ्ट असेल. तसेच नवीन पिढीला सामाजिक दायित्व विषयी जाण निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश होता.”

डॉ गीतांजली महाडिक आणि डॉ अभिजित महाडिक हे अनेक वर्षांपासून सामाजिक संस्था प्रगती फाऊंडेशन च्या माध्यमातून जनसेवा करीत आहेत परंतू सामाजिक दायित्व विषयी भान ठेवून त्यांनी हे सुरू केलेलं कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.