
मुंबई: देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गुप्त भेट झाली असून या दोघांनी दीड तास चर्चा केल्याचं वृत्त आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेची युती होणार असल्याचे संकेत मिळत असून ही राजकीय भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रभादेवीच्या हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये आज ही गुप्त भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांसोबत एकही सहकारी आणि सुरक्षा रक्षक नव्हता. हॉटेलच्या मागच्या दाराने राज यांनी प्रवेश केला. त्यानंतर काही वेळाने फडणवीस यांनी पुढील दरवाजातून प्रवेश केला. या बैठकीसाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. दोन्ही पक्षातील कुणालाही या बैठकीची कल्पना देण्यात आली नव्हती. यावेळी राज आणि फडणवीस यांचे मित्र गुरुप्रसाद रेगे हेच उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मिळू शकला नसला तरी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही भेट असेल, असं सूत्रांनी सांगितलं.
शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने राज्यात नवीन समीकरण निर्माण झालेलं असतानाच आता भाजप आणि मनसेची जवळीक वाढू लागल्याने आणखी एक राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.






