
नवी दिल्ली: पतियाळा हाऊस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेली अनेक वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या निर्भयाच्या कुटुंबाने या निकालावर समाधान व्यक्त केले आहे.
२२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता तिहार तुरुंगात त्यांना फाशी दिली जाणार आहे. चारही दोषींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायाधीशांसमोर सादर करण्यात आले होते. २०१२ साली १६ डिसेंबर रोजी या घृणास्पद घटनेने आधी दिल्ली आणि नंतर संपूर्ण देश हादरला होता. यानंतर निर्भयाला न्याय मिळवून द्या या मागणीसाठी देशभर निदर्शनं झाली होती.
निर्भयाची आई आशा देवी म्हणाल्या, ‘माझ्या मुलीला न्याय मिळाला. या चारही दोषींना फाशीची शिक्षा मिळाल्याने देशातल्या महिलांना बळ येईल. या निर्णयामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित राहील.’
निर्भयाचे वडील बद्रिनाथ सिंह म्हणाले, ‘न्यायालयाच्या निर्णयाने मी समाधानी आहे. दोषींना २२ जानेवारीला सकाळी सात वाजता फाशी दिली जाणार आहे. या निकालामुळे गुन्हा करणाऱ्या लोकांच्या मनात दहशत निर्माण होईल.’ पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्ष मनीषा गुलाटी म्हणाल्या, ‘आता निर्भयाच्या आत्म्याला शांती मिळाली. हा खूप चांगला निकाल आहे.’







