
मुंबई: जलयुक्त शिवार देवेंद्र फडणवीसांची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना होती. या योजनेतून अनेक जिल्ह्यांना फायदा झाल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. मात्र नव्या सरकारनं ही योजना गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी निधी न देण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे नाशिक, जळगाव, नंदुरबार, नगर, धुळे या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांना ब्रेक लागणार आहे. विभागीय आयुक्तांचे आदेश डावलून जलयुक्त शिवार योजनेसाठी निधी दिल्यास आर्थिक गैरव्यवहार म्हणून कारवाई करण्यात येईल, अशा सूचना विभागीय आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत.
ठाकरे सरकारच्या या निर्णयाबद्दल भाजपानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाला शत्रू मानणारं सरकार सध्या सत्तेत आहे. मात्र भाजपाला शत्रू मानणारे आता राज्यातील जनतेशीदेखील शत्रूप्रमाणे वागू लागले आहेत. मागील सरकारच्या चांगल्या योजना थांबवल्या जात आहेत. प्रत्येक पावलावर सरकार हेच करत आहे. सरकारची ही भूमिका दुर्दैवी आहे, अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.






