
नवी दिल्ली:
छत्रपतींची तुलना करणं योग्य नाही. कितीही मोठा नेता असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांशी त्याची तुलना योग्य नाही असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नरेंद्र मोदी हे नरेंद्र मोदी आहेत. मोदी देशाचे नेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे असून त्यांची तुलना कोणाशी होणार नाही असे राऊत म्हणाले.
शिवरायांची मोदींशी तुलना केलेली पटते का, असा सवाल छत्रपतींच्या वंशजांना विचारणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा रोष ओढवून घेतला होता. छत्रपती संभाजीराजे यांनी अगदी एकेरी उल्लेख करत संजय राऊत यांना करड्या शब्दात समज दिली होती. उद्धवजी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येकवेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमावेळी सिंदखेडराजामध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते.
दरम्यान भुमिका स्पष्ट करा, चिडचीड करुन फायदा नाही’ असा टोला संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे यांना लगावला.
छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी कुणाचीही तुलना कधीच होऊ शकत नाही. पण पक्षात काही अतिउत्साही कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे पक्ष नेतृत्त्वावर चिखलफेक केली जाते. त्यामुळे अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालण्याची गरज आहे’,असं शिवेंद्रराजे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वेगळी प्रतिमा आहे.






