
मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला. भारताने ऑस्ट्रेलियापुढे अवघे २५६ धावांचे आव्हान ठेवले, ते ऑस्ट्रेलियाने ३७.४ षटकांतच पूर्ण केले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा १० विकेट्सने अक्षरश: धुव्वा उडवला. वॉर्नर याने १२८ धावा तर फिंचने ११० धावा कुटल्या. दोघांनीच हे लक्ष्य पूर्ण करत टीम इंडियाची दाणादाण उडवली. या दोन्ही सलामीवीरांनी ३० चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर ३७.४ षटकांत विजयाचे लक्ष्य पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक ७४ धावा केल्या. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मा, शिखर धवन आणि के.एल. राहुल या तिघांनाही संधी दिली होती. वानखेडेवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १३ वर्षानंतर हा सामना होत झाला. २०१२पासून वानखेडेवर झालेल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला होता.











