शासनमान्य अनुदानित शाळांचा होणार कायापालट

मुंबई: राज्यात सत्ता परिवर्तन होवून महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अधिपत्याखली स्थापन झाले. मंत्री मंडळ विस्तार नाट्य झाल्यानंतर आता सर्व मंत्री कामाला लागले आहेत. खासकरून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर कामाचा सपाटा सुरू केला आहे. विविध विषयावर बैठका घेऊन शालेय शिक्षण सुधारणांबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करत आहेत.

शिक्षण क्षेत्रात बदल घडवण्यासाठी विभागातर्फे ‘थिंक टँक’ स्थापन करण्यात येणार असून, यामध्ये समाजातील विविध घटकांना स्थान देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात पालकांचाही समावेश करण्याचा विचार आहे. असे झाले तर प्रथमच निर्णयप्रक्रियेत पालक प्रतिनिधींचा समावेश होणार आहे. राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सुद्धा येत्या काळात भरीव काम करणार आहे.

आज देखील वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत बैठक घेऊन सरकार मान्य अनुदानित शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी चर्चा करून प्रेझेन्टेशन दिले.

शासनाचे अनुदान असलेल्या शाळांमधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा हा गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असावा यासाठी आज मा. मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली . तसेच राज्यातील शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम उभारण्याचा संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.