
राजकोट: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय मिळवत पहिल्या सामन्याचा बदला घेतला.
टीम इंडियाने ५० षटकांत ६ विकेट्सवर ३४० धावांचा दणदणीत स्कोअर केला. ३४० धावांचे आव्हान पेलताना ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली. स्टीव्ह स्मिथ ९८ धावांवर बाद झाल्याने त्याचं शतक हुकलं. स्मिथची फलंदाजी ऑस्ट्रेलियाला मात्र तारू शकली नाही. शिखर याच्या ९६ धावांसह लोकेश राहुलच्या ८० धावा आणि कर्णधार विराट कोहलीच्या ७८ धावांच्या जोरावर भारताला ३४० धावांचा डोंगर उभा करता आला. फलंदाजीच्या वेळी जायबंदी झालेला शिखर धवन क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्या जागी युजवेंद्र चहल आला होता. जायबंदी ऋषभ पंतच्या जागी मनीष पांडे तर शार्दुल ठाकूरच्या जागी नवदीप सैनीला आजच्या सामन्यात संधी देण्यात आली होती.
मालिकेत आता भारताची ऑस्ट्रेलियाशी १-१ अशी बरोबरी झाली आहे. मालिकेतला अखेरचा निर्णायक सामना बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडिअमवर रविवारी १९ जानेवारीला रंगणार आहे.











