भारताचा ऑस्ट्रेलिया संघावर सात विकेट्सने मोठा विजय, 2-1 ने मालिका जिंकली

बेंगलरू: मुंबईतील सामना पाहुण्या ऑस्ट्रेलियाने तर राजकोटमधील सामना भारताने जिंकल्याने मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरला होता. हा सामना जिंकणारा संघ मालिकेवर आपले नाव कोरणार होता. हे आव्हान भारताने स्वीकारले आणि गोलंदाजी व फलंदाजीत वर्चस्व गाजवत विजय खेचून आणला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य सात गडी राखून ४७.३ षटकांत भारताने सहज गाठले.

सलामीवीर रोहित शर्माचे खणखणीत शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या ८९ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने बेंगळुरू वनडेत दणदणीत विजय साकारला असून तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने खेचून आणली आहे. नवीन वर्षातील भारताचा हा सलग दुसरा मालिका विजय ठरला आहे. वर्षारंभीच भारताने टी-२० मालिकेत श्रीलंकेचा २-० असा धुव्वा उडवला होता. दरम्यान, ८ चौकार आणि ६ षटकारांसह १२८ चेंडूंत ११९ धावांची खेळी करणारा रोहित शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीने ६९ धावांची सलामी दिली. राहुल मोठी खेळी साकारू शकला नाही. वैयक्तिक १९ धावा करून तो बाद झाला. दरम्यान, रोहित शर्माला आज चांगलाच सूर गवसला होता. तो मोठी खेळी करेल असे स्पष्ट संकेत मिळत होते. रोहितने ही अपेक्षा पूर्ण केली आणि डावाची सूत्रे स्वत:कडे घेत भारताला विजयाची वाट दाखवली. अर्थात कर्णधार विराट कोहलीने रोहितला सुरेख साथ दिली.