मनसेचे राज्यस्तरीय अधिवेशनात अमित ठाकरे यांचे लौंचिंग ; मनसेच्या नव्या झेंड्याच अनावरण

मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाआघाडीमुळं बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे आपल्या पक्षाची नवी भूमिका मांडणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोरेगाव येथे नेस्कोच्या मैदानात आज अधिवेशन पार पडले. दरम्यान आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंचं लौंचिंग झालं आहे. बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे मनसेच्या नेतेपदीबाबत घोषणा केली.

मनसेच्या गोरेगाव येथील अधिवेशनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करून, त्यांना अभिवादन करून राज ठाकरे यांनी अधिवेशनाला सुरुवात केली.

शिवमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या भगव्या झेंड्याचं राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. राज ठाकरे यांनी अधिवेशनाला आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर मनसेने आजपर्यंत केलेल्या सर्व आंदोलनांची उजळणी करण्यात आली.

मनसेमुळं महाराष्ट्रात मराठी भाषेला सन्मान मिळत असल्याचा मनसे नेत्यांनी अधिवेशनात दावा केला तसेच सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसे ‘शॅडो कॅबिनेट’ स्थापन करणार असल्याचे सांगण्यात आले.

मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळायलाच हवा, असा ठराव सिने अभिनेता संजय नार्वेकरांनी मांडला तसेच मराठी चित्रपट निर्मात्यांच्या प्रत्येक कामासाठी एक खिडकी योजना असावी , असाही ठराव नार्वेकरांनी मांडला. नार्वेकरांनी त्यांच्या भाषणात राज ठाकरे यांचा उल्लेख जाणता राजा असा केला.

नवनिर्वाचित मनसे नेते यांनी शिक्षणाबाबतचा त्यांचा पहिला ठराव या अधिवेशनात मांडला.