शिवसेनेचा जल्लोष: मी मुख्यमंत्री होईन असा शब्द दिला नव्हता, माझ्यावर जबाबदारी आली आहे ती मी स्वीकारली आहे – उद्धव ठाकरे

मुंबई: शिवसेनेचा बांद्रा येथे वचनपूर्तीचा जल्लोष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमात विविध मनोरंजन, नृत्य, कला, संगीत रजनी व करमणुकीचे कार्यक्रमाची रेलचेल होती. सत्ता स्थापनेला पन्नास दिवस झाले आणि याचे औचित्य साधून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त वचनपूर्ती जल्लोष आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. मी मुख्यमंत्री होईन, असा शब्द दिला नव्हता. माझ्यावर जबाबदारी आली आहे. ही जबाबदारी स्विकारली आहे. वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. आमच्या त्या मित्राने दिलेले वचन मोडले. बाळासाहेबांच्या मंदिरात वचन दिले ते पाळले नाही.  मी खोटे बोलणार नाही, म्हणून मी वेगळा मार्ग स्विकारला. मला खोटं पाडण्याचे प्रयत्न झाले. मात्र, तुमच्या विश्वासाला कधीही तडा दिला जाणार नाही. मी मरण पत्करेन पण खोटे कधीही बोलणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार  मंत्री आदित्य ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला. शिवसेनेतील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर सगळ्यांना मंचावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. 

यावेळी उद्धव यांनी भाजपला आणि मनसेला जोरदार टोला लगावला. शिवसेनेचा रंग भगवाच आहे.  शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला, अशी टीका झाली. मात्र मला आज त्यांना (भाजप) विचारायचे आहे की, तुमचं काय काय उघड झाले? युती तर तुम्ही २०१४ लाच तोडली होती आणि आज आम्हाला नावे ठेवत आहात, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

मी डरणारा नाही तर मी लढणारा आहे, हे लक्षात असूद्या. मी वेगळा मार्ग स्वीकारला कारण,  मला खोटे पाडण्याचा प्रयत्न झाला. तेव्हाच्या मित्रपक्षाने मला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेला फसवण्याचा प्रयत्न झाला. २०१४ मध्ये तुम्ही अदृश्य हातांच्या मदतीने सरकार स्थापन केली. मी जी जबाबदारी स्वीकारली होती ती माझ्या स्वप्नातही नव्हती. आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही, आमचे अंतरंग भगवेच आहे, असे उद्धव  यावेळी म्हणालेत.